कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालणारे कोरोना योद्धे झाले बेरोजगार!
महानगर पालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 17 कोविड सेंटर उभारले होते. तिथे आरोग्य कर्मचारी कंत्राट पद्धतीवर काम करत होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व नागरिक घरात बसले असताना हे सर्व आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून दिवसरात्र मेहनत करून आणि कोरोना रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य पार पाडत होते. मात्र त्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीने शिरकाव केला होता. तेव्हा प्रशासनाला परिस्थिती हाताळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी सर्वाना कंत्राट पद्धतीवर नोकरीवर रुजू करण्यात आल होते. पगारही चांगला देण्यात आला होता. मात्र आता त्याच कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या योद्ध्यांना आता उपोषणाला बसावे लागले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पाहून त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.