पुणे- शहरात सीएए, एनपीआर आणि एनसीआर कायद्याला विरोध करण्यासाठी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
सीएए कायद्यामुळे हिंदू पण अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ही लढाई फक्त मुस्लिमांची नाही तर दलित, भटक्या हिंदूंची पण आहे. कारण, त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. मोदी शहांची हिंदू मुस्लीम ऐक्याला नजर लागली आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. सीएए, एनआरसी हा संविधानावरचा हल्ला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणले. तेव्हा आता आंबेडकर स्वीकारायचा की गोळवलकर हे देशाने ठरवावे, असे आव्हाड म्हणाले. या देशात पुन्हा मनुस्मृती राज येऊ देणार नाही, ते कागद मागायला आले तर त्यांना संविधान दाखवा. याच पुण्यातल्या नथुराम गोडसेने गांधींना गोळ्या घातल्या. गांधीची हत्या मुस्लिमतुष्टीकरणामुळे झालेली नाही. तर, या देशाचे दरवाजे बहुजनांसाठी उघडले जातील, म्हणून महात्मा गांधीची हत्या केली गेली आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.