पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची जेवणाची चिंता सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेने समाज कल्याण विभागामार्फत 'शरद भोजन' योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार गोरगरिबांना जेवण्याची सोय केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी, कातकरी, ठाकर समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. लॉकडाऊनमुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, आता 'शरद भोजन' या जिल्हा परिषदेच्या उपक्रमामुळे डोगराळ प्रदेशात राहणाऱ्या या नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यातील गावांमधील अंगणवाडी सेविका गावातील निराधार, दिव्यांग, गोरगरीब, गरजूंना रोज दोन वेळेचे जेवण बनवून देत आहे.