मुंबई - एक अभियंता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांबाबत मला पूर्वीपासूनच कुतूहल आहे. भव्यदिव्य किल्ले, त्यांचे बांधकाम, दगडांमध्ये कोरलेल्या वास्तू हे सर्व काही अप्रतिम आहे. त्याकाळात जर आपण असतो तर अनेक गोष्टी शिकता आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
छत्रपतींच्या काळात एक इंजिनिअर म्हणून बरेच काही शिकता आले असते - जयंत पाटील - जयंत पाटील शिवाजी महाराज स्तुती
आज राष्ट्रीय अभियंचा दिन आहे. त्यानिमित्त रायगडाचे निर्माते आणि शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकरांना जयंत पाटील यांनी वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अभियांत्रिकीचे उत्तम छडे गिरवता आले असते, अशा शब्दात पाटील यांनी आपले कुतूहल व्यक्त केले.
राष्ट्रीय अभियंता दिनी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतींना वंदन करत रायगडाच्या बांधकामाची स्तुती केली. रायगड माझा आवडता किल्ला आहे. महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे बांधकाम केले. तत्कालीन अभियांत्रिकीचे हे एक आदर्श उदाहरण आहे. दरबारातील लोकांची कुजबुज महाराजांच्या सिंहासनापर्यंत स्पष्ट ऐकू येण्याचे अफाट तंत्र रायगडाच्या वास्तूत आहे. गडावरील हत्ती तलाव, बाजारपेठ, श्री जगदीश्वराचे मंदिर, आखीव रेखीवपणा, नियोजनबद्धता सर्व काही मनमोहक आहे, असेही पाटील म्हणाले.
पाटील यांनी शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकरांचा एक किस्सा यावेळी सांगितला. रायगडाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती खुश झाले आणि त्यांनी हिरोजींना 'जे काही मागेल ते देण्याची तयारी दर्शवली. अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त केली. गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर स्वत:चे नाव कोरावे जेणेकरून त्यांना सदैव महाराजांच्या आणि स्वराज्याच्या चरणाशी राहता येईल. त्यांच्या या मागणीला महाराजांनी परवानगी दिली. 'सेवेसी ठायी तत्पर' अशी अक्षरे कोरलेली पायरी या भव्य वास्तूच्या निर्मात्याची आपल्याला आठवण देतात, असे जयंत पाटील यांनी सांगितले.