पुणे Jayant Patil On NCP MLA :लाईफ संस्थेच्या वतीने लाईफ स्मृती सन्मान पुरस्काराचं आयोजन पुण्यातील नीतू मांडके सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
तर पक्ष स्थापनेच्या भानगडीत कोणी पडणार नाही :यावेळी येत्या 6 तारखेला निवडणूक आयोगासमोर होत असलेल्या सुनावणी बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, अनेक तर्क सुनावणी बाबत लावले जात आहेत. भारताच्या इतिहासात पक्षाचा संस्थापक जिवंत असताना त्यांनाच बाहेर काढण्याचा निर्णय काही लोक बसून घेत आहेत. त्यातही पक्ष आमच्याकडे असल्याचा आविर्भाव कोणी मांडत असेल तर याबाबत राजकीय पक्ष पळवून किंवा चोरण्याची पद्धत सध्या नव्याने सुरू झालेली दिसेल. आम्हाला विश्वास आहे की, निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. आमदार गेले की पक्ष जातो, अशी परिस्थिती झाली तर कोणताही राजकीय व्यक्ती पक्ष काढण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उद्याच्या 6 तारखेच्या सुनावणीमध्ये समोर येतील आणि एका सुनावणीमध्ये हे संपणार नाही, असं यावेळी पाटील म्हणाले.
शासनाचा ओबीसींवर अन्याय :ओबीसी आरक्षणाबाबत पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी सर्वांची भूमिका आहे. मंत्रालयात जागा भरताना काही ओबीसीच्या जागा रिक्त असेल आणि ज्यांना जागा मिळालेल्या नसतील तर ते तपासण्यात यावे. असे असेल तर ओबीसींवर हे सरकार अन्याय करत आहे. तसेच जातनिहाय सर्वेक्षण व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. पण हे सरकार ते करत नाही, असं यावेळी पाटील म्हणाले.