पुणे :पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. तसेच या शहराला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा देखील दर्जा आहे. पुणे शहरात राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. असे असले तरी धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरात मुलींचे व महिलांचे बेपत्ता होण्याचे आणि बलात्काराच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर कात्रज विकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये एका महिलेने थेट मान्यवरांच्या समोरच महिला सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. या महिलेने बलात्कार झाल्यावर आम्ही तक्रार द्यायची का? असा थेट सवाल केला.
'बलात्कार झाल्यावर तक्रार द्यायची का?' : पुण्यात कात्रज विकास आघाडीच्या वतीने खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, पालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये या महिलेने हा प्रश्न उपस्थित केला. महिला म्हणाली की, कात्रज परिसरात दारूचे दुकान रात्रभर सुरू असते. त्यामुळे महिलांना रात्री उशिरा कामावरून घरी जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना दारू पिऊन शिवीगाळ केली जाते. याबाबत तक्रार दाखल करूनही प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही. आता आम्ही काय बलात्कार झाल्यावर तक्रार द्यायची का?, असा सवाल या महिलेने उपस्थित केला.