पुणे- आपल्या लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी, यासाठी पुण्यातील एका कुटुंबाने चक्क जागरण गोंधळ घातला. एरवी एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे. पण एखाद्या कुत्र्यासाठी घातलेला हा जागरण गोंधळ चर्चेचा विषय ठरत आहे.
ब्रुनोचा जागरण गोंधळ घालताना सोलापूरचे अंकू-पंकू गोंधळी...
पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे २ वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा असून त्याचे नाव ब्रुनो आहे. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हते. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू, असा नवस केला.
त्यानंतर ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांनी बकरा कापून लोकांना जेवू घातले आणि जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला. ब्रुनोच्या जागरण गोंधळासाठी जाधव यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
ब्रुनोसोबत जाधव यांची मुलगी
यापूर्वीही जाधव यांनी रॉटविलर जातीचा कुत्रा पाळला होता. मात्र, तो १० महिन्याचा असताना, त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा आपल्या आवडीच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने, जाधव यांची मुलगी दुःखी झाली. त्यामुळे जाधव यांनी आणखी एक रॉटविलर जातीचा कुत्रा आणला होता.