पुणे - धवलक्रांती वाढविण्याकरता जेके बोवाजेनिक्स आणि जेके ट्रस्टच्यावतीने सार्वजनिक पातळीवर देशात पहिल्यादांच म्हशींवर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढविण्याकरता उपक्रम सुरू असून त्याला आता यशही मिळत आहे.
देशात पहिल्यादांच म्हशींवर आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा प्रयोग खरं तर आयव्हीएफ हे तंत्रज्ञान ज्यांना मुले होत नाहीत त्यांच्यासाठी वापरले जाते किंवा एखाद्या महिलेच्या गर्भात आयव्हीएफ (सरोगेट) भ्रृण सोडून तो वाढविला जातो. असाच प्रयोग आता म्हैस आणि गायीच्या बाबतीत जे के ट्रस्टचे श्याम झंवर यांनी केला. याला रेमड या कंपनीने विशेष अशी साथही दिली. पुण्यातील शिरूर तालुक्यातील राहु या गावातील सोनवणे बंधूंच्या ५ म्हशींवर तर बाफना फार्म्समधील गीर गायीवर हा प्रयोग करण्यात आला आहे.
हेही वाचा -किरकोळ भांडणावरुन चौघांची एकाला जबर मारहाण, गुन्हा दाखल
2017 साली ट्रस्टच्या प्रयत्नातून गोठवलेल्या आयव्हीएफ भ्रृणापासून देशात सार्वजनिक पातळीवर पहिले नर वासरू जन्माला आले. या प्रयोगाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. 2016 मध्ये त्यांनी पशुंसाठी शिरूरमधील वडगाव-रासाई येथे 42 हेक्टर जागेवर उच्च तंत्रज्ञानयुक्त ईटी-आयव्हीएफ प्रयोगशाळा आणि ४ मोबाईल कँटल ईटी-आयव्हीएफ प्रयोगशाळा सुरू केली त्यानतंर या प्रयोगाकडे शेतकरीही सकारात्मक नजरेने पाहायाला लागला. 2018 मध्ये राधा या गाईपासून १४ सरोगेट भ्रूण प्रत्यारोपण करून १४ आयव्हीएफ वासरे जन्माला घातली गेली. ही दुग्ध आणि पशुपालन क्षेत्रातील मोठी क्रांती ठरली. या प्रयोगाकरता आत्तापर्यंत २० कोटी इतका खर्च आला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय गोकुळ मिशन'च्या माध्यमातून देशी गाईच्या वंशाच्या संवर्धनासाठी हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. श्याम झंवर यांनी सांगितले.
हेही वाचा -पुण्यातील वारजे पुलाखाली बॅगेत आढळला मृतदेह
आता या उपक्रमाचे शेतकरी स्वागत करत असून भविष्यात दूध वाढीसाठी याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उंचावणार असून वाढत्या लोकसंख्येला या उपक्रमामुळे दुधाचा तुटवडा जाणवणार नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे शेतीत विविध प्रयोग होत आहेत. अनेक संकरित वाण बाजारात येत आहेत. त्यानुसार आता दुग्धक्षेत्रात नव्याने प्रयोग होऊ लागल्याने शेतकऱ्यांना नक्कीच अच्छे दिन येतील असे सध्यातरी या आयव्हीएफच्या प्रयोगातून दिसून येत आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या