बारामती -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना खोलीच्या बाहेर थांबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यापासून पवारांची मानसिकता बिघडल्यासारखी वाटते, असा खोचक टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत लगावला. पडळकर आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीने निवडणूक लढवली'
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार ठीक ठिकाणी सांगत असतात. हाच धागा पकडून पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली. पुढे म्हणाले की, आटपाडी तालुक्यातून सांगली, सातारा जिल्हा सोडून अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीने निवडणूक लढवली. अजित पवारांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन स्थानिक नेत्यांचे पाठबळ नसताना निवडणूक लढवली तर तुमची ही अवस्था तीच होईल.
'गायकवाड आयोगाचा अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतरित का नाही केला?'
राज्यात विविध प्रश्न आहेत. मराठा आरक्षण का गेले. गायकवाड आयोगाचा अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतरित का नाही केला. तुमचेच वकील सांगतात की, राज्य सरकार कागदपत्र देत नाहीत. वेळोवेळी माहिती देत नाहीत. ओबीसीचे आरक्षण का संपले. पदोन्नतीतील आरक्षणाचा जी. आर कधी रद्द करणार. बीडमधील आरोग्य कर्मचारी आपल्या समस्या घेऊन पवार यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या विषयावर तुम्ही बोला. प्रश्न सोडून तुम्ही दुसरीकडे कशाला जाताय, असेही पडळकर म्हणाले.