प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ पुणे - रायगड येथील इर्शाळवाडीत भूस्खलन झाल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीत एनडीआरएफने बचावकार्य सुरू (Madhav Gadgil on Landslide) केले आहे. एनडीआरएफची चार पथके बचाव आणि मदतकार्य करत आहेत. बुधवारी रात्री इर्शाळवाडीत भूस्खलनाची घटना घडली होती. गेल्या काही वर्षात माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी अशा अनेक छोट्या मोठ्या भूस्खलनाच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत.
सरकार पर्यावरणाबाबत गंभीर नाही - इर्शाळवाडीत झालेल्या घटनेबाबत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सरकार माहिती दडपत आहे. तसेच खोटी माहिती पुढे आणत आहे. त्यामुळे हे अयोग्य पद्धतीने होत आहे. सरकार पर्यावरणाबाबतीत गंभीर नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.
आमच्या समितीने ३१ ऑगस्ट २०११ रोजी शासनाला आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात भविष्यात होऊ शकणाऱ्या भूस्खलन दुर्घटनांची शक्यता आणि त्यावरच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. तसेच काही सूचना देखील करण्यात आल्या होत्या. यात सह्याद्रीचा ३० टक्के भाग हा अतिसंवेदनशील आहे. या अहवालात सह्याद्रीचे कमी संवेदनशील, मध्यम संवेदनशील, आणि अतिसंवेदनशील असे तीन भाग आहेत. त्यापैकी ३० टक्के भाग हा अतिसंवेदनशील असल्याने या भागात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद केले होते - माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ
सूचनांकडे कानाडोळा - अतिसंवेदनशील भागात कोणताच मानवी हस्तक्षेप म्हणजेच दगडखाणी, रस्ते आणि बांधकाम अशी कामे चालणार नाहीत. परंतु, याच सूचनांकडे सरकारकडून आणि प्रशासनाकडून सोयीस्करपणे कानाडोळा करण्यात आला. उलट एका मुख्यमंत्र्यांनी माझा अहवाल नाकारला होता. पर्यावरणसंदर्भातली खोटी माहिती पुढे केल्याने देशाचेच नुकसान होत असल्याचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी सांगितले आहे.
माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी - आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला होता. माळीण हे गाव डोंगरावरून आलेल्या चिखलाखाली गाडले गेले हे कळलेसुद्धा नाही. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावावरही डोंगर कोसळल्याने हे अख्खे गावच चिखलाखाली दबले होते. यातही अनेकांना जीव गमवावा लागला होता. तर आता रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतही भूस्खलन होऊन अख्खे गावच चिखलाखाली दबले आहे. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -
- Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडीत बचावकार्य सुरुच; आणखी दोन मृतदेह आढळले, आकडा 18 वर
- Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात इर्शाळवाडीवर झाला घात; माळीणच्या घटनेची झाली आठवण
- Landslide Incidents Maharashtra: इरशाळवाडीसारख्या महाराष्ट्रात किती घडल्या आहेत दुर्घटना? माळीणची आजही अनेकांनाआठवण