पिंपरी-चिंचवड : आम्ही पोलीस आहोत, तुम्ही तुमचे दागिने सुरक्षित ठेवा, दागिने इकडे आणा रुमालात ठेवतो असे म्हणून अनेक महिला, नागरिकांचे दागिने हातचलाखीने घेऊन पोबारा करणाऱ्या इराणी टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश ( Pune police arrested gang of thieves ) केला आहे. आरोपीकडून 6 लाख 22 हजारांचे साडेबारा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तसेच, मोबाईल आणि दुचाकीचा देखील समावेश आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर, आरोपींना दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले माहिती देताना तीन आरोपींना अटक, एक फरार
हैदर तहजिब सय्यद (वय 55), युनुस साबुर सय्यद (वय 46), गाझी रफिक जाफरी (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा चौथा साथीदार हैदर ऊर्फ लंगडा पप्पू सय्यद ऊर्फ इराणी वय 35 हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस असल्याचे सांगून करायचे सोने लंपास -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण विठ्ठलराव देशमुख वय- 64 हे 4 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास कोकणे चौक रहाटणी येथील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी करून घरी जात होते. तेव्हा तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील दोघांनी देशमुख यांना ते पोलीस असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. देशमुख यांचे दागिने सुरक्षित पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ते काढून घेतले. त्यानंतर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने देशमुख यांचे लक्ष इतरत्र वेधून तिघांनी देशमुख यांचे दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम सोन्याचे दागिने पळवून नेले.
महिलेने केला इराणी टोळीचा विरोध -
या घटनेनंतर वाकड पोलीस सतर्क झाले. त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हाच, एक महिलेला इराणी टोळीने पोलीस असल्याची भासवून त्यांच्या दागिन्यांविषयी बोलत असताना महिलेला संशय आला आणि आरडाओरडा केला. त्यामुळं तेथील इराणी आरोपी पळून गेले. याची माहिती आणि सीसीटीव्ही वाकड पोलिसांनी पाहिला. आरोपी इराणी असल्याचं निष्पन्न झाले. तसेच, दुसऱ्या एका सीसीटीव्ही वरून ते मुंबई च्या दिशेने जात असल्याने ठाण्यातील आहेत हे स्पष्ट झालं. त्यांच्या इराणी वस्तीमध्ये जाऊन त्यांना पकडणे कठीण होते. कारण अनेकदा त्यांच्या वस्तीत जाऊन त्यांना ताब्यात घेणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
असे केलं इराणी टोळीला जेरबंद -
वाकड पोलिसांची दोन पथके ठाण्याला पोहचली. त्यानंतर स्थानिक पोलीस खडकपाडा पोलीस ठाण्यातील माहितगार अंमलदारांना घेऊन आंबिवली परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र सुरुवातीला पोलिसांना अपयश आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला. बनेली येथील एका हॉटेलच्या पाठीमागे आरोपी बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाकड पोलिसांच्या दोन्ही पथकांनी छापा मारून दोघांना पकडले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच एकजण पळून गेला आणि दलदलीच्या गवताळ भागात लपला. पोलिसांनी त्याला दलदलीच्या गवताळ भागातून शोधून काढले आणि अटक केली. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त; तर, एवढे गुन्हे दाखल -
अटक केलेल्या आरोपींकडून 6 लाख 22 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, मोबाईल फोन हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार, निगडी, हिंजवडी आणि मानपाडा ठाणे शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. एका-एका गुन्हेगारांवर तब्बल 40 -40 गुन्हे दाखल असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले आहे. बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 80 गुन्हे केले असल्याच देखील त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -पिंपरीत चाललंय काय? पिस्तूलाचा धाक दाखवून दोन ठिकाणी खंडणीची मागणी