पुणे : बुधवार पेठेत जवळपास 3 हजारहून अधिक महिला या वैश्याव्यवसायाचे काम करतात. या महिलांसाठी काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सहेली संस्था आहे. या संस्थेत जवळपास 2200 हून अधिक महिलांची नोंदणी आहे. या महिलांच्या विविध प्रश्नावर ही संस्था काम करत असते. जेव्हा लॉकडाऊन लागले तेव्हा समाजातील विविध घटकांकडून तसेच या संस्थेकडून या महिलांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. मात्र अश्या वेळेस या महिलांना मोठा आर्थिक फटका बसला. तेव्हा या संस्थेकडे नोंदणी केलेल्या काही महिलांनी संस्थेकडे वेगळ्या कामाची मागणी केली. आज पाहता पाहता या उपक्रमात 17 महिलांनी सहभाग घेतला आहे. आज ते या परिसरात स्वच्छतेचे काम करत आहेत.
क्लिन रेड स्वच्छतेतून रोजगार :पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये 'क्लिन रेड' हा एक वेगळा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. इथे याआधी एचआयव्ही जागृतीचे, पीअर एज्यूकेटरचे काम केलेल्या स्त्रिया आता वस्ती सफाईचे आणि कचरा व्यवस्थापनाचे काम करू लागल्या आहेत. वस्तीतल्या स्त्रियांसोबत दोन दशकांहून अधिक काळ काम करणारी वैश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची एकमात्र संघटना 'सहेली एचआयव्ही/एड्स कार्यकर्ता संघ' आणि सोबत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी 'स्वच्छ सहकारी संस्था' व 'एएसआर सर्व्हिसेस' ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी यांचे संयुक्त पाठबळ लाभलेल्या उपक्रमाची ही ओळख आहे.
कोविडची पार्श्वभूमी :'क्लिन रेड'चे बीज कोविडकाळात रुजले. एरवीही आपला समाज बुधवार पेठेपासून अंतर राखून असतो. लॉकडाऊन नियमांमुळे तर सामाजिक अंतर अधिकच वाढले. कोविड निर्बंधांमुळे महिलांची कामे थांबले होते. ते पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेव्हा सरकारी वा बिगर-सरकारी मदतीवर किती दिवस काढणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला. वस्तीबाहेर राहणाऱ्या आणि धुणीभांडी वा अन्य घरकामे करणाऱ्या काही जणींची कामेही या काळात गेली. तर याच काळात काहींनी आधीची कामे सोडून वेगळी काम करायचे हे ठरवले. नुसती मदत नको, काम हवे अशी मागणी या महिला 'सहेली' कडे करू लागल्या. मग आम्ही विविध संस्था संघटनेच्या मदतीने या भागात स्वच्छतेचा काम सुरू केले आहे. असे यावेळी सहेली संस्थेच्या अध्यक्षा तेजस्वी सेवेकरी यांनी सांगितले आहे.
स्थानिक गरज : जेव्हा या महिलांनी मागणी केली की आम्हाला मदत नव्हे तर हक्काचे काम हवे, तेव्हा या मागणीची पूर्तता करणारी रोजगाराची एक कल्पना सहेली संघाकडे आधीपासून होती. जी स्थानिक भागातल्या एका महत्त्वाच्या गरजेला उद्देशून होती. बुधवार पेठेतल्या विशेषतः वैश्याव्यवसायाच्या पाच-सहा गल्ल्यांमधील कचरा व्यवस्थापन हा दीर्घ काळ दुर्लक्षित विषय होता. किंबहूना इथल्या कचरा व्यवस्थापनाची स्थिती या ठिकाणच्या महिलांसारखीच दुर्लक्षित राहिली होती. पुणे शहरात प्रत्येक वसाहतीमध्ये महानगरपालिकेची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा पोहोचते. तशीच ती बुधवार पेठेतही आहे. मनपा गाडी कचरा उचलायला सकाळच्या वेळेत येते. इथल्या लोकांचा दिवसच दुपारी सुरू होतो. त्यामुळे गाडीच्या वेळात सर्वसाधारण रहिवासी सोडता अन्य घरातून कचरा दिला जाऊ शकत नाही.
एएसआरचे पाठबळ :या पूर्ण परिसराच्या स्वच्छतेचे काम मनपाने केवळ तीन कामगारांवर सोपवलेले होते. संपूर्ण कचरा उचलणे हे त्यांच्याही आवाक्याबाहेरचे काम होते. परिणामी कचरा उचलला जात नाही. अरूंद रस्ते, जुने वाडे, निमुळते जिने इत्यादी अनेक साफसफाईच्या आड येणाऱ्या व्यावहारिक समस्याही होते. बुधवार पेठेचा परिसर भौगोलिकदृष्ट्या जुन्या पुण्यातल्या अन्य भागांसारखाच असला तरी इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ जास्त आहे. साहजिकच कचरा तयार होण्याचे प्रमाणही अन्य भागांपेक्षा जास्त आहे. कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था ही इथली एक प्रलंबित निकड होती. ती भागवण्याच्या आणि महानगरपालिकेच्या सेवांना हातभार लावण्याच्या उद्देशाने 'क्लिन रेड'ची आखणी झाली. सहेली संघाच्या या कल्पनेला एएसआरचे पाठबळ मिळाले आणि कामाला सुरुवात झाली.