महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kurulkar Honeytrap Case : डीआरडीओने कुरुलकर यांच्या लॅपटॉप ऐवजी एटीएसला दिला दुसऱ्याच व्यक्तीचा लॅपटॉप

प्रदीप कुरुलकर यांच्या लॅपटॉप ऐवजी डीआरडीओने एटीएसला दुसऱ्याच व्यक्तीचा लॅपटॉप दिल्याची घटना घडली आहे. एटीएसने ही बाब डीआरडीओच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर कुरुलकरांचा लॅपटॉप एटीएसच्या ताब्यात देण्यात आला.

Kurulkar Honeytrap Case
Kurulkar Honeytrap Case

By

Published : Jun 28, 2023, 7:34 PM IST

पुणे :हनीट्रॅपमध्ये पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे. एटीएसकडून कुरुलकर यांना अटक केल्यानंतर तपासासाठी डीआरडीओने कुरुलकर यांच्या लॅपटॉप ऐवजी दुसराच लॅपटॉप एटीएसला दिल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब एटीएसने डीआरडीओच्या लक्षात आणून दिल्यावर कुरुलकर यांच्या जवळ असलेला लॅपटॉप अखेर एटीएसकडे सोपविण्यात आला आहे.

कुरुलकरांचा लॅपटॉप अखेर एटीएसच्या ताब्यात :डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 3 मे रोजी एटीएसने अटक केली होती. तेव्हा त्यांनी वापरलेला मोबाइल, लॅपटॉप आणि इतर साहित्यही एटीएसने डीआरडीओकडून जप्त केले होते. त्यानंतर एटीएसने लॅपटॉप आणि इतर साहित्य पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी दिले होते. त्या तपासणीत डीआरडीओने दिलेला लॅपटॉप कुरुलकरांचा नसून अन्य कोणाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एटीएसने ही बाब डीआरडीओचे संचालक, दक्षता आणि सुरक्षा विभाग, कर्नल प्रदीप राणा यांना पत्राद्वारे कळवली. त्याची दखल घेत कर्नल प्रदीप राणा यांनी कुरुलकर यांचा लॅपटॉप सील करून २६ मे रोजी पुन्हा एटीएसच्या ताब्यात दिला.

जरदास गुप्ता सहआरोपी :जरदास गुप्ता यांच्यावर डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अडकवून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सहआरोपी म्हणून एटीएसने गुन्हा दाखल केला आहे. जरादास गुप्ता आणि कुरुलकर दोघेही मोबाईलवर बोलत असताना, कॉल युनायटेड किंगडममधून असल्याचे भासवत होते. पण हे कॉल्स पाकिस्तानी गुप्तचरांकडून येत असल्याचे तपासात समोर आले आहे. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांनी भारतीय बनावटीच्या संरक्षण उपकरणांची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली होती.

तपासात अनेक गुपिते उघड : कुरुलकरांचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणांकडून त्यांची चौकशी सुरू होती. त्यांचे कृत्य उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एटीएसकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कुरुलकरांना 3 मे रोजी अटक करून त्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त करून त्याची झडती घेण्यात आली. आता तोच लॅपटॉप गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्याचबरोबर महिनाभर चाललेल्या तपासात अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता पाहता गुजरात लॅबचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा -Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकर यांच्यावरील गुन्ह्यांच्या कलमात वाढ, पाकिस्तानी एजंटला केले सहआरोपी

ABOUT THE AUTHOR

...view details