पुणे - गणपती बाप्पा मोरया... असा जयघोष थेट अरुणाचल प्रदेशमधील टेंगा व्हॅली येथील चायनीज सीमेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या पोस्टवर झाला. मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत भारतीय लष्करातील 1 मराठा बटालियनच्या सैनिकांनी सीमेवरील लष्कराच्या ठाण्यात हुबेहुब दगडूशेठ गणपतींच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
श्रीं ची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्यात आली होती
सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सीमेवर लढणारे सैनिकही गणेशाची भक्ती करतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही. त्यामुळे 1 मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहुब दोन फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य करत बटालियनला गणेशोत्सवापूर्वी मूर्ती सुपूर्द केली.