इंद्रायणी नदीत प्रदूषण वाढले पुणे (आळंदी) Indrayani River Pollution : आळंदी येथील इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदी काठी असणारे काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडलं जातं आहे. त्यामुळं वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येते. शुक्रवारी (10 नोव्हेंबर) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं इंद्रायणी नदीत पावसाच्या पाण्याबरोबर केमिकल युक्त फेस दिसत होता. दरम्यान, या प्रदुषणामुळं नदीकाठावरील राहणाऱ्या नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तसंच ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्यानं भाविकांना इंद्रायणीत स्नान करणं अवघड झालंय.
नदीचं पाणी तीर्थासमान : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या देवाच्या आळंदीतील आणि देहूतील इंद्रायणी नदी वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानली जाते. त्यामुळं लाखो भाविक आळंदी आणि देहूला दर्शनासाठी येत असतात. संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येतात. या वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान आहे. अनेक वारकरी या नदीत स्नान करतात, शिवाय तीर्थ म्हणून नदीचं पाणी देखील पितात. त्यामुळं ही नदी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.
तर जलसमाधी घेणार : "भगवान कोकरे हे वारकरी संप्रदायाचे महाराज गेली दहा दिवसांपासून इंद्रायणी काठी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व इतर समस्या बाबतीत आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी देखील प्रशासन इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्ती बाबत दखल घेत नाही, हे दुर्दैव आहे. भविष्यात इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन आणि निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण तसंच जलसमाधी घेतली जाईल", असा इशारा इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिलाय.
नदी सुधार प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत :दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांनी इंद्रायणी नदीचं पात्र प्रदूषित होत आहे. त्यामुळं नदी सुधार प्रकल्प तयार करण्यात आला. यात नदीपात्र स्वच्छ करणं आणि शुद्धीकरण करण्यासाठी उपाय योजना सुचवणं, नदी काठावरील मुख्य ठिकाणी रिव्हरफ्रंट्स विकसित करण्याची योजना तयार करणं आदींचा समावेश आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनानं स्वीकारलाय. तसंच हा प्रस्ताव केंद्र शासनाकडं पाठवण्यात आला असून तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा -
- Pune Indrayani River Pollution : आळंदीतील इंद्रायणी नदीवर आढळला विषारी फेस; नागरिकांच्या जीवाला धोका
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, इंद्रायणी नदीत उडी मारून जीवनयात्रा संपवली
- Sanjeevan Samadhi Sohala : माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा प्रारंभ 7 लाख भाविक येण्याची शक्यता