पुणे : टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव काल सकाळी पुण्यातून बेपत्ता झाले होते. केदार जाधवने 27 मार्च रोजी पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्याने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याच्या 75 वर्षीय वडिलांचा शोध सुरू केला. पुण्यात कोथरूड पोलिसांना ते अखेर सापडले आहेत.
मुंढवा परिसरात सापडले : केदार जाधव याने दाखल केलेल्या मिसिंग रिपोर्टनुसार, त्याच्या वडिलांना स्मृतिभ्रंश आहे. ते त्यांच्या कोथरूड येथील घरातून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महादेव जाधव हे मुंढवा परिसरात सापडले. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केदारच्या वडिलांचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्वे नगरमधील सीसीटीव्हीमध्ये ते शेवटचे दिसले होते. महादेव जाधव हे पुण्याच्या कोथरूड भागातील रहिवासी आहेत. 27 मार्च रोजी सकाळी ते कुटुंबातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. महादेव जाधव यांना फक्त मराठी बोलता येते. त्यावेळी त्यांच्याकडे मोबाईल फोन देखील नव्हता. केदार जाधवने त्याच्या वडिलांचा फोटो आणि फोन नंबर त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.