पुणे - कोरोनावरील लस आपल्याकडेच तयार होते. तरीदेखील या लसींचे दर इतके महाग का, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ही लस सर्वांना 150 रुपयांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कोरोनामुळे मी आठवडाभराचा मुदत देतो, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
होम क्वारंटाईनमुळेदेखील रुग्णसंख्येत वाढ -
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असली, तरी 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. परंतु या लसीचे जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. लसीच्या या दराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्प का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वाढणाऱ्या रुग्णांना व्यवस्थित उपचार देण्यासाठी सरकारने होस्टेल ताब्यात घ्यावेत. वेळ आल्यास प्रायव्हेट हॉटेल आणि हॉस्पिटलदेखील ताब्यात घ्याव्यात. होम क्वारंटाईनमुळेदेखील संख्या वाढत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही याबाबत आतापर्यंत योग्य ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सामंजस्य असणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन चर्चा करा, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.