पुणे Pune Breaks World Records : 'विद्येचं माहेरघर' अशी पुणे शहराची ओळख आहे. याच पुण्यनगरीत जगातील अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी येतात. विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही बिरुदं सार्थ ठरवणारा विश्वविक्रम पुण्यात नोंदवला गेलाय. तीन हजारहून अधिक पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगत चीनचा रेकॉर्ड मोडला आहे. या विश्वविक्रमानंतर पालक आणि मुलांनी 'वंदे मातरम्, भारत माता की जय', अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. चीनमध्ये आठ वर्षापूर्वी 2 हजार 479 पालकांनी आपापल्या पाल्यांना गोष्ट सांगितली होती. मात्र पुण्यात 3 हजार 77 पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगून चीनचा विक्रम इतिहासजमा केलाय. पुण्यातल्या सुप्रसिद्ध स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक क्षण जिवंत झाला.
चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम :पुणे महापालिकेच्या आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या संयुक्त विद्यमानं 'पुणे पुस्तक महोत्सव' होत आहे. त्यानिमित्तानं गुरुवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या, या उपक्रमात 3 हजार 77 पालकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटं गोष्टी सांगितल्या. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तिपर गीतांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारताच्या नावानं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड :डिजिटल युगात मुलांच्या बरोबरच पालकांना देखील वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशानं गुरुवारी पुणे महापालिका आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीनं विश्वविक्रम करण्यात आला. यावेळी 3 हजार 77 पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यांनी सहभाग घेतला होता. यात सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्ल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या 'निसर्गाचा नाश करू नका' या पुस्तकातील धड्याचं सलग तीन मिनिटे वाचन केलं आणि मुलांना गोष्ट सांगितली. यावेळी गिनिज बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी 'पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या' हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावानं प्रस्थापित केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला.