पुणे : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. या समारोहाचा एक भाग म्हणून कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या राज्यातील 186 कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. त्यानुसार आज विशेष माफी देण्यात आलेल्या कैद्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य दिनी कैद्यांची सुटका
स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी : देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आज सुटका होणाऱ्या कैद्यांना 'गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे' आवाहन केले. तसेच कैद्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
माफी योजनेचा उद्देश : या योजनेचा उद्देश हा कैद्यांमध्ये शिस्त आणि आचरण निश्चित करणे आहे. तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकर सुटका करणे हा आहे. केंद्रीय गृह सचिवालयाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि निकष विहित केले आहेत. तीन टप्प्यांमध्ये एकूण 581 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी 206 कैदी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189 कैदी कारागृहातून मुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने दिलेले आहेत.
'असे' आहेत कैदी :स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले पुरुष कैदी आहेत. एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7 कैदी आहेत. 12 ते 21 वर्षे वयात गुन्हा केलेले कैदी आहेत. तसेच त्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेला असे 10 कैदी आहेत. शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेले परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले 2 कैदी आहेत. एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी 66 टक्के कालावधी पूर्ण करणारे 167 कैदी आहेत.
हेही वाचा :
- Independence Day 2023: 'बीबी का मकबरा' रंगला तिरंगी रंगात, पाहा व्हिडिओ
- India independence Day 2023 Updates: बापुंच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे-पंतप्रधान मोदी
- Independence Day 2023 : मंत्रालय, सीएसटी रंगले तिरंगी रंगात, Watch Video