बारामती -कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्णक्षमतेने भरलेली रुग्णालये, रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी नातेवाईकांची घालमेल आणि आपल्याला उपचार मिळणार का या शंकेने हतबल झालेले रुग्ण अशी परिस्थिती असते. मात्र बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात काहीस वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णालयातील हॉल व प्रवेशद्वा जवळच्या प्रतीक्षा कक्षात कोरोना रुग्णांसाठी 60 बेड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ही सर्व परिस्थिती पाहिल्यास बारामतीतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.
बारामतीत शासकीय मेडिकल कॉलेज, तीन नटराज असे चार कोविड केअर सेंटर, रुई आणि सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल आणि बारामती हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र बारामतीत १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने बेडचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण यांच्या टीमने तातडीने हालचाली करून, साठ बेडस, साठ बेडशीट, गाद्या यांची उपलब्धता करुन देत, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणखी एक तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड सेंटर उभारले आहे.