पुणे : पुण्यात 3 बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्यावतीने पहाटेपासून छापेमारी करण्यात येत आहे. पुण्यातील औंध येथील सिंध सोसायटीमध्ये ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हे बांधकाम व्यवसायिक राजकीय नेत्यांच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जात आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आज सकाळपासूनच आयकर विभागाच्यावतीने औंध परिसरातील सिंध सोसायटीमध्ये राहणाऱ्या या 3 व्यवसायिकांवर छापेमारी करण्यात आली आहे. याआधी देखील पुण्यात अश्याच पद्धतीने विविध बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांवर छापेमारी करण्यात आली होती.
बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर :पुण्यातील बाणेर परिसरातील सिंध सोसायटी ही उच्चभू सोसायटी म्हणून ओळखली जाते. एकाच सोसायटीत राहणारे तीन बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. हे तिन्ही व्यावसायिक एकमेकांचे व्यावसायिक भागीदार आहेत. आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या निवासस्थानी पोहोचून प्रत्येक बिल्डरची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. बिल्डरांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचे समोर आले आहे.