पुणे: 'जेनियल इन्फो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या माध्यमातून पुणे शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांकडून कूपनवर नाव नंबर घेण्यात आले. त्यानंतर तुम्हाला गिफ्ट लागले आहे, असे सांगून या नागरिकांना कंपनीच्या कार्यालयात बोलावले गेले. तिथे त्यांना एक छोटेस गिफ्ट देखील देण्यात आले. तसेच कंपनीतर्फे आयोजित 'हॉलिडे पॅकेज'ला जायचे असेल तर 45 दिवसांच्या आधीच बुकिंग करा, असे सांगितले गेले. त्यानुसार काही नागरिकांनी बुकिंगही केले; मात्र पुढे कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास 40 हून अधिक नागरिकांची या कंपनीने फसवणूक केली असून ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
'या'नागरिकांनाही चुना: 'जेनियल लिमिटेड' या कंपनीच्या पुण्यातील संचालकांवर या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेला 'जेनियल लिमिटेड' कंपनीने 'हॉलिडे पॅकेज' देण्याचे आमिष दाखवून 2 लाख 36 हजार रुपयांनी गंडविले. काही असाच प्रकार 'डी-मार्ट'मध्ये खरेदी करायला गेलेल्या व्यक्तीसोबत घडला आहे. 'जेनियल लिमिटेड' कंपनीने त्याला सपत्नीक कंपनीच्या कार्यालयात बोलावले आणि क्रेडिट कार्ड वरून अडीच लाख रुपयांचे 'हॉलिडे पॅकेज' घेण्यास भाग पाडले; मात्र त्या व्यक्तीलाही बुकिंगनंतर कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.