पुण्यात दोन दिवसात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू ; रुग्णसंख्या चारशेने वाढली - pune corona latest news
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 3496 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 1751 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात बऱ्या झालेल्या 53 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे -पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मागील दोन दिवसात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे चारशे नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीसह पाच महिलांचा समावेश आहे.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 3496 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 1751 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात बऱ्या झालेल्या 53 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 1551 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 194 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तीन हजारावर गेलाय. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चालली आहे. मागील तीन दिवसात 509 नवीन रुग्ण सापडले आहेत. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 600 हुन अधिक रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाचशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत.