पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेलच्या गेटवर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचे अपहरण करून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. हितेश गोवर्धन मूलचंदानी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे अपहरण करून कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद आज पिंपरी बाजार पेठेत पाहायला मिळाले. घटनेच्या निषेधार्थ आज बाजार पेठ बंद ठेवण्यात आली.
तरूणाच्या खूनाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड बाजारपेठेमध्ये आज बंद पाळण्यात आला आरोपीला लवकरात-लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्या, असे फलक संतापलेल्या नागरिकांच्या हातात होते. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रोहित किशोर सुखेना यांनी फिर्याद दिली आहे. अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, आरबाज शेख, अक्षय संजय भोसले, लंगडा यांच्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी पहाटे अमीन खान याने हॉटलेच्या गेट जवळ लघु शंका केली. त्यावेळी कामगार साहिल लालवाणी याने इथे लघुशंका करू नका असे सांगितले, याचाच राग मनात धरून अमीनने त्याला शिवीगाळ करून कामगार कैलास पाटीलच्या डोक्यात बिअरची बाटली फोडुन जखमी केले होते. हे पाहून हॉटेलमधील आणखी कर्मचारी आणि मालक बाहेर आले. पळून जात असलेल्या आरोपींच्या पाठीमागे मयत हितेश हा धावत गेला. तेव्हा, संबंधित आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार करून खून होता. या प्रकरणी एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चार जण फरार आहेत. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस शाखेचे निरीक्षक रंगनाथ उंडे हे करत आहेत.