कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये जप्त पुणे :कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोट- निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली. भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्तातही वाढ :निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. असे, कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.
दिव्यांगाना ईव्हीएम यंत्रावर मतदानासाठी मार्गदर्शन :निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांर्गत चिंचवड मतदारसंघ निवडणूक कार्यालयात आज दिव्यांगाना ईव्हीएम यंत्राची माहिती देण्यात आली.दिव्यांगांना सहजतेने मताधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा दिव्यांगाना आत्मनिर्भर करण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे, अशी भावना यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.
तज्ज्ञामार्फत माहिती : निवडणुकीच्या दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका आणि बॅलेट युनिटवर असलेली ब्रेल लिपी, अल्पदृष्टी असणा-या व्यक्तींसाठी मॅग्निफायिंग ग्लासची सुविधा, मूक बधीर व्यक्तींना वाचा उच्चार तज्ज्ञामार्फत दिलेली माहिती या सर्व बाबींमुळे इतर कोणाच्याही मदतीशिवाय आता स्वतः मताधिकार बजावता येणार असल्याचा आनंद आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अधिकाऱ्यांची नेमणूक : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक ज्योत सोनवणे, निदेशक शिवदास वाघमारे, सतीश गायकवाड, जीवन ढेकळे अरुण बांबळे, विष्णू साबळे, तानाजी कोकणे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे जनार्दन कोळसे, चिंचवड बधीर मूक विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ता गणेश टिळेकर, वाचा उच्चार तज्ज्ञ बालाजी गीते, वि. रा. रुईया मूक बधीर विद्यालयाचे शरद फड यांची नेमणूक या कामकाजासाठी करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था :निवडणूक यंत्रणेने मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष स्वयंसेवक नेमले आहेत, व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या मतदार संघातील सर्व दिव्यांग मतदारांनी आपला मताधिकार बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. कोळसे यांनी केले. दिव्यांग व्यक्तींसाठी भारत निवडणूक आयोगाने अॅप सुरु केले आहे. त्याचादेखील वापर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ढोले यांनी केले आहे.
हेही वाचा -Sambhajinagar And Dharashiv Rename : औरंगाबाद झाले ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद झाले 'धाराशिव'; केंद्राची परवानगी