बारामती : आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांचेच सरकार होते. केंद्रातही त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवलं नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून भाजपवर शरसंधान साधले आहे.
कायदा मोडून स्पर्धा भरविणाऱ्यांवर कारवाई
या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी काही करत नाही असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काहींचा सुरू आहे. कायदा मोडून कुणी स्पर्धा भरवत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार. आम्हालासुद्धा स्पर्धा घेता येतात. मात्र आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही असेही पवार बारामतीत बोलताना म्हणाले.
हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय
बारामती येथे शनिवारी आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. राज्य शासनापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन राज्य शासनाला करावे लागते. बैल हा प्राणी पाळीव प्राणी न गणला जाता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय आहे, असे पवार यावेळी म्हणाले.
...तर लॉकडाऊन लागणार
कोरोना परिस्थिवर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ७०० मेट्रीक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन लागल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल. कोरोनाचे सावट दूर व्हावे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हालाही वाटते नागरिकांनी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे. मात्र जिथे गर्दी जास्त होते. तिथे कोरोना संक्रमणाची प्रकरणं अधिक अढळून येतात. आषाढी वारीदरम्यान पंढरपूरजवळ पायी वारीला परवानगी देण्यात आली. त्यानंतर पंढरपूरमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याचेही दिसून आले. बारामती तालुक्यातील कोरोना संक्रमण कमी झाले नाही. मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जीएसटी करातून अॅम्बुलन्स वगळण्यात आली आहे. त्यामुळे दोन लाख रूपयांनी अॅम्बुलन्सची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने अधिक ५०० अॅम्बुलन्स घेतल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्येही १४ व्य वित्त आयोगातून अॅम्बुलन्स घेण्यात आल्या आहेत. अॅम्बुलन्स अभावी कोणत्याही नागरिकाला अडचणीचा सामना करवा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
त्या व्यक्तीवर कारवाई होणार
पवार साहेबांचा आवाज काढून रेमडेसीव्हिरची मागणी करणाऱ्यांना अटक केली आहे. कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल. अशा पद्धतीने आवाज काढून कुणी फसवत असेल मग तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा, गटा-तटाचा असला तरी त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, असेही पवार यांनी ठणकाऊन सांगितले.
राज ठाकरे हा मुद्दा आमच्यासाठी संपला
उगीच जुन्या कढीला ऊत कशाला आणायचा. या संदर्भात मी बोललो आहे. ज्या लोकांना कुठे थारा राहत नाही. ते अशा प्रकारे बोलातात. आमच्यासाठी तो मुद्दा केव्हाच संपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी लवकरच बैठक
प्रत्येकाला आपला पक्ष संघटना वाढवण्याची मुभा आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास अघाडी सरकार चालवत आहोत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांच्या बाबतीत वरिष्ठ नेते निर्णय घेतात. मात्र नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आम्ही अधिकार देणार आहोत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि मी आमची एक बैठक नगरपालिका निवडणुकांपूर्वी होईल, त्यामध्ये एकत्र निवडणुकांबाबत ठरवू असेही पवार म्हणाले.
हेही वाचा -बाबरी प्रकरणात हात वर करणाऱ्यांनी शिवसेनेला तालिबानी म्हणू नये, संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर