पुणे : तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार आहेत. या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मिळाले आहे. यापैकी 19 ऑक्टोबरचा भारत विरुद्ध बांगलादेश सामना मुख्य आकर्षण असेल. यापूर्वी 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया सामना पुण्यातील नेहरु स्टेडियमवर खेळला गेला होता. केनियाने या सामन्यात वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत सनसनाटी विजय नोंदवला होता.
'विश्वचषकाचे आयोजन करणे सन्मानाची बाब' : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना विश्वचषकाच्या तयारीला सुरवात करेल. महाराष्ट्र प्रिमियर लीगचा अंतिम सामना 29 जूनला होणार आहे. '27 वर्षांनी विश्वचषक स्पर्धेचे पुण्यात आयोजन होणार आहे. भारतीय संघाचे सामने आयोजित करणे ही कायमच आनंदाची बाब असते. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणे आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संधी आम्हाला मिळाली हा आम्ही आमचा सन्मान मानतो', असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
ऋतुराज गायकवाडचे अभिनंदन केले : रोहित पवार यांनी या वेळी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी व एकदिवसीय संघात निवड झालेल्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचे अभिनंदन केले. ऋतुराज गुणी फलंदाज आहे. विंडीज दौऱ्यात तो यशस्वी होईल आणि विश्वचषक संघातही तो दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राचा केदार जाधव टीम इंडियात होता. यंदा घरच्या मैदानावर होणाऱ्या ह्या स्पर्धेत देखील महाराष्ट्राचे अनेक खेळाडू दिसतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.