पुणे - महाराष्ट्राने पवार कुटुंबियांना भरभरुन प्रेम दिले आहे. असेच प्रेम द्या. मी नवीन आहे. पण, दादा आणि साहेब काळजी करू नका. विश्वास ठेवा मी माझी जबाबदारी पूर्ण करून दाखवेल, असा शब्द मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी त्यांच्या वडील आणि आजोबांना दिला. पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ काल फोडण्यात आला त्यावेळी त्यांनी त्यांचे पहिले भाषण केले.
मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. ते म्हणाले, की हे माझे पहिले भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. या भाजप शिवसेना सरकारने अत्यंत चुकीची कामे केली आहेत. बेरोजगारी, महागाई आणली आहे. फक्त स्वप्ने दाखवण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. ते म्हणाले, की शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला. त्याचप्रमाणे, मी पिंपरी चिंचवड आणि मावळचा विकास करणार आहे. यावेळी पार्थ यांनी त्यांचे वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांना माझ्यावर विश्वास ठेवा असेही सांगितले.
यावेळी अजित पवार म्हणाले, की पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार लोक या शहरात आले. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे विकास करात आला. यावेळी त्यांनी पार्थ पवार आणि अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे लोकांना आवाहन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना काटे आदी उपस्थित होते.