पाहा काय म्हणाले शरद पवार पुणे Sharad Pawar : पुण्यातील खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. "मी अजून म्हातारा झालेलो नाही. माझ्यात भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आहे", असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता? यावरून आता चर्चांना उधाण आलं आहे.
मी अजून म्हातारा झालेलो नाही : यावेळी बोलताना शरद पवारांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मिश्किल टिप्पणी केली. "तुम्हा लोकांबद्दल (कार्यकर्ते) माझी एक तक्रार आहे. तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये माझ्या वयाचा सातत्यानं उल्लेख करता. पण मी तुम्हाला सांगतो की, मी अजून म्हातारा झालेलो नाही. भल्याभल्या लोकांना सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका. तुमचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्यासाठी सर्व काही करू आणि नवीन इतिहास घडवू," असं शरद पवार म्हणाले.
लवकरच नवा इतिहास घडविणार : एकजुटीच्या बळावर लवकरच महाराष्ट्राचं चित्र बदलणार असल्याचं शरद पवार म्हणाले. "काहीजण मला म्हणतात, तुम्ही ८३ वर्षांचे झालात. मात्र मी अजूनही तरुणच आहे. लवकरच नवा इतिहास घडविणार", असा निर्धार शरद पवार यांनी शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला. यावेळी माजी आमदार विलासराव लांडे, विठ्ठल मणियार, हिरामण सातकर, देवेंद्र बुट्टे पाटील, देवदत्त निकम, बबनराव कुऱ्हाडे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही : शरद पवार यांनी पुढे बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "आपला लढा अजून बाकी आहे. कांदा निर्यातीचा प्रश्न आहे. दुधाला भाव नाही. ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाची चिंता नाही. शेतमालाला बाजार मिळत नाही. कांद्या निर्यातबंदी केल्यानंतर शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय. बळीराजा संकटात कसा जाईल, असे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत", असा हल्लाबोल त्यांनी केला.
हे वाचलंत का :
- शरद पवारांचा वाढदिवस 'मामाच्या गावात' साजरा; कोल्हापुरातील गोलिवडेकरांनी दिल्या शुभेच्छा
- राजकारणातील 'चाणक्य' शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस, पंतप्रधान मोदींसह 'या' नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
- मराठा आरक्षणाला शरद पवार, सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध- देवेंद्र फडणवीस