महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंडमध्ये जेवण बनविण्याच्या वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून केली हत्या - दौंड खून

जेवण बनविण्याच्या वादातून आरोपीने पत्नीचा खून केल्याची घटना दौंड तालुक्यातील वाखारी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दौंडमध्ये जेवण बनविण्याच्या वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून केली हत्या
दौंडमध्ये जेवण बनविण्याच्या वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून केली हत्या

By

Published : May 11, 2020, 8:34 AM IST

दौंड(पुणे) - तालुक्यातील वाखारी येथे जेवण बनविण्याचा वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकूने वार करीत तिचा खून केला. त्यानंतर भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मुलावर व शेजारील दोघांवरही पोटात चाकूने वार केला. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी फलके हक अब्दुल हक शेख ( रा. वाखारी गायकवाड वस्ती, वाकडापूल, ता. दौंड मुळगाव धानोरा म्हाली, ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती) यास अटक केली आहे. ही घटना ९ तारखेला शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत शालू गजानन राजनहिरे (वय ४५ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून देवानंद गजानन राजनहिरे (मुलगा) व शेजारी राहणारे केशव मुरलीधर मोरे व त्यांची पत्नी विजया केशव मोरे यांच्यावरही चाकूने पोटात वार केल्याने हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शालू यांचा आरोपी यांच्याबरोबर दहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून हे तिघे वाखारी गावच्या हद्दीत राहत होते. तेथील सिद्धी स्नँक्स सेंटर या हॉटेलमध्ये काम करीत होते. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हे तिघे सध्या शेतात मोलमजुरी करीत होते. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोपीने शालु यांना अजून जेवण का बनविले नाही, असे विचारत पत्नी शालूला शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे असलेला मुलगा देवानंद याने वडिलांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपी फलके हक याने त्याच्या खिशातील छोटा धारदार चाकु काढून पत्नी व मुलाच्या पोटावर वार केले. पोटात गंभीर वार लागल्याने पत्नी जाग्यावरच बेशुद्ध पडली.

शेजारी राहणारे केशव मोरे व त्यांची पत्नी विजया मोरे हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांच्यावरही पोटात आरोपीने गंभीर वार करून जखमी केले. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सर्व जखमींना बोरीपारधी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु शालू गंभीर जखमी असल्याने तेथील डॉक्टरांनी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेहण्यास सांगितले. शालू यांना लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी शालूला मृत घोषित केले.

दरम्यान, देवानंद राजनहिरे याने यवत पोलीस ठाण्यात आरोपी वडीलाविरोधात फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केली. त्याच्याविरोधात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहेत. दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केशव मोरे व त्यांची पत्नी विजया मोरे या दोघांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details