महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Junnar Crime: जमीन विक्रीच्या प्रकरणात पतीनेच काढला पत्नीचा काटा, मुलाने खून केल्याचा केला बनाव - पतीनेच काढला पत्नीचा काटा

Junnar Crime: शिरोली येथे एका मुलाने तंबाखूला पैसे न दिल्याने आईचा डोक्यात खोरे घालून खून केला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. महिलेचा खून मुलाने नाही, तर त्याच महिलेच्या नवऱ्याने केल्याचे समोर आले आहे.

Junnar Crime
Junnar Crime

By

Published : Nov 17, 2022, 11:11 AM IST

पुणे: जुन्नर तालुक्यातील शिरोली येथे एका मुलाने तंबाखूला पैसे न दिल्याने आईचा डोक्यात खोरे घालून खून केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून महिलेचा खून मुलाने नाही तर त्याच महिलेच्या नवऱ्याने केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पोलिसांनी खोलपर्यंत जाऊन तपास केल्यानंतर या घटनेत पतीनेच आपल्या पत्नीला संपवल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पतीनेच मुलाविरोधात फिर्याद दिली: खून केलेल्या पत्नीचे नाव हे अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०, राहणार शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर) असे असून बारकू सखाराम खिलारी (वय-६६) असे पतिचे नाव असून नारायणगाव पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी पतीनेच मुलाविरोधात फिर्याद दिली होती. खिलारे हे अनेक वर्षांपासून शिरोली येथे वास्तव्यास असून पत्नी अंजनाबाई आणि त्यांना दोन गतिमंद मुले आहेत.

निर्णयाला विरोध दर्शवला:बारकू खिलारी, पत्नी अंजनाबाई व दोन गतिमंद मुले यांच्या समवेत ते राहत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने शेतीची विक्री करण्याचा निर्णय बारकु यांनी घेतला होता. मात्र त्यांच्या पत्नीने शेती विकु नका, असे म्हणत त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. या गोष्टीवरून पती पत्नीत मंगळवारी कडाक्याचे भांडण झाले होते. या रागाच्या भरात बारकू खिल्लारी याने घरात असलेले खोरे पत्नीच्या डोक्यात घातले. त्यावेळी त्यांचा मार जिव्हारी लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. ही सर्व घटना त्यांच्या घरातील गतिमंद मुलांनी पाहिली होती.

अधिक तपास पोलिसांकडून सुरू: त्यानंतर कुणाला संशय येऊ नये, म्हणून त्याने मुलाने खून केल्याची फिर्याद नारायणगाव पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा मुलगा अमोल याला अटक देखील केली आहे. पोलिसांना या घटनेत संशय वाटल्याने त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांना बारकु याचे रक्ताने मखलेले कपडे सापडले. त्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी बारकु याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यानेच खून केल्याचे तापसत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details