पुणे- पतीकडून पत्नीचा छळ होणे, त्रास देणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. मात्र, पत्नीने पतीला त्रास दिल्याची घटना सणसवाडी येथे घडली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका पत्नीने पतीचा छळ करुन त्याला त्रास दिला. अखेर पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. महादेव कंकाळ असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
हेही वाचा-पूर्व वैमनस्यातून युवकावर तलवारीने वार; तीन आरोपी अटकेत, एक फरार
सणसवाडी येथे राहणाऱ्या महादेव कंकाळ व मनीषा कंकाळ यांचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतरच या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणांवरुन भांडण सुरू झाले. ते भांडण नंतर वाढतच असल्याने महादेवने याबाबत आई-वडिलांना सांगितले.
दरम्यान, 26 जानेवारी 2020 ला महादेवने आईला फोनकरुन पत्नी खूप त्रास देत आहे. मी पत्नीच्या त्रासाला कंटाळलो आहे, असे सांगून आत्महत्या केली.
महादेवच्या अंत्यविधीसाठी पत्नीकडील कोणीही आले नव्हते. दरम्यान, महादेवच्या घरच्यांनी सर्व धार्मिक क्रियाक्रम उरकल्यानंतर काल (गुरुवारी) शिक्रापूर पोलिसांत पत्नी मनिषाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मनिषा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.