पुणे :राज्यात ऊस वाहतूकदारांच्या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात एकीकडे विविध जिल्ह्यातील मुकादमांकडून या ऊस वाहतूकदारांची फसवणूक होत आहे, तर दुसरीकडे इतर राज्यातील मुकादमांकडून देखील या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. (Fraud Of Sugarcane Transporters). ऊस वाहतूकदार या टोळींना आणण्यासाठी गेले असताना थेट त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या खून करण्यात येत आहे. मुकादमांकडून या ऊस वाहतूकदारांची जवळपास 800 कोटी रुपयांनी फसवणूक होत असून सरकारने तसेच साखर आयुक्तांनी जर निर्णय घेतला नाही तर साखर आयुक्त कार्यालय बाहेर ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. (sugarcane transporters protest).
ऊस वाहतुकदार हा शेतकरी असून तो शेतीला पुरक व्यवसाय म्हणून ऊस वाहतूक व्यवसाय करीत असतो. ऊस वाहतुकदार हा शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस वाहून कारखान्यापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतो. परंतु शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस तोडण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते. या मजुरांना ऊस वाहतुकदार हे ऊस तोडणीच्या हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी मजूर यावेत म्हणून या मजुरांना अगोदरच अँडव्हान्स रक्कम देवून ऊस मजूर ठरवतो. त्यासाठी तो कारखान्याकडून स्वतःजवळील तसेच खाजगी सावकारांकडून कर्ज काढून अशी रक्कम एकत्रीत करून तो उस तोड मजुरांना देत असतो. परंतु हे ऊसतोड मजुर हे ऊस वाहतुकदारांकडून लाखो रुपये घेवून ऊस तोडणीसाठी येत नाहीत.
आज याबाबत ऊस वाहतुकदार संघटनेकडून साखर संकुल येथे साखर आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी आर्थिक फसवणूक झालेल्या ऊस वाहतुकदार शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत करावी व त्यांचे उध्दवस्त होणारे संसार वाचवावेत. तसेच ऊस वाहतुकदार शेतकऱ्यांनी ऊस तोड मजुरांना देणेसाठी साखर कारखान्याची घेतलेली अॅडवान्स रक्कम जी ऊसतोड मजुरांना दिलेली आहे परंतु ऊस तोड मजुरांनी फसवल्यामुळे ते ऊस वाहतुकदार शेतकरी कारखान्यांना ऊस पुरवठा करु शकत नसल्यामुळे ऊस वाहतुकदार शेतक-यांकडून कारखानदार त्या दिलेल्या अॅडव्हान्सची बेकायदेशीर पध्दतीने ऊस वाहतुकदार शेतक-यांकडून वसुली साखर कारखानदार करीत आहेत ती त्वरीत थांबविण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावेत. तसेच ऊस वाहतुकदार शेतक-यांची फसवणूक केलेल्या ऊसतोड मजुरांवर त्वरीत गुन्हे दाखल करून घेण्याची सुचना पोलीस प्रशासनाला द्यावेत. सदर गुन्हे हे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनलाच रजिस्टर करावेत व ते कारखान्याच्या असणा-या न्यायकक्षेत चालवावेत. आणि यापुढे ऊस वाहतूकदारांना ऊस तोड मजूर हे कारखान्यांनी अथवा गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळाने येथून पुढे मजूर पुरवठा करावा.
ऊस तोड मजुरांकडून आमचे ऊस वाहतुक करणारे बंधु प्रशांत उर्फ आण्णा भोसले यांची निघृण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणा-या नराधमांना कठोर शासन होण्यासाठी शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत व त्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्याला पात्रतेप्रमाणे शासकीय नोकरीत समाविष्ठ करून घ्यावे. आणि अशा स्वरुपाच्या झालेल्या हत्यामुळे ऊस वाहतुकदार शेतक-यांमध्ये प्रचंड स्वरुपात दहशत निर्माण झालेली असून ऊस वाहतुकदार शेतकरी हा जीव मुठीत धरून व्यवसाय करीत आहे. अशा ऊस वाहतुकदार शेतक-यांना आपल्याकडून कायदयाचे संरक्षण मिळावे व ऊस तोड मजूरांनी ऊस वाहतुक करणारे वाहतुकदार शेतक-यांची आर्थिक फसवणुक करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. यामुळे हजारो उस वाहतुकदार शेतक-यांची कुटुंबे उध्दवस्त झालेली आहेत. तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध कडक कायदा करणे आवश्यक आहे. तो शासनाने त्वरीत करावा. ऊस तोडणी मजुरांनी ऊस वाहतुकदार शेतक-यांचे पैसे बुडविणेसाठी व त्यांना वेठीस धरणेसाठी ऊस वाहतुकदार शेतक-यांवरती खोटया स्वरुपांचे गुन्हे केलेले आहेत. त्या ऊस वाहतुकदार शेतक-यांवरील गुन्हे त्वरीत रद्द करावेत, अश्या मागण्या या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
सरकारने मागण्यांचा सहानभुतीपुर्वक विचार करुन त्या १५ दिवसाचे आत मान्य करण्यात याव्यात. अन्यथा नाईलाजस्ताव हजारो ऊस वाहतुकदार शेतकरी आपली ऊस वाहतुकीची वाहने घेवून साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.