पुणे - कोरोनामुळे व्यवसाय विस्कळीत झाले असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने राज्य सरकारने रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आजपासून पुणे शहरात शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार रेस्टॉरंट सुरू झाली आहे.
आजपासून हॉटेल, रेस्टॉरंटस् सुरू; ग्राहकांसह व्यावसायिक आनंदी - पुणे हॉटेल सुरू न्यूज
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होती. यामुळे व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला. आता हळूहळू अनलॉक केले जात आहे. आजपासून राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली आहे.
![आजपासून हॉटेल, रेस्टॉरंटस् सुरू; ग्राहकांसह व्यावसायिक आनंदी pune restaurants](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9053515-thumbnail-3x2-hotel.jpg)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध कायम ठेवले होते. हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर आणण्यासाठी आता निर्बंध उठवण्यात आले आहेत. आजपासून राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंटस् सुरू करण्यात आले. गेले सहा महिने हॉटेल्स बंद असल्याने हॉटेल चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता मात्र, शासनाच्या नियमांचे पालन करून हॉटेलचालकांनी व्यवसाय सुरू केला आहे.
महानगरपालिका हद्दीतील हॉटेल्स सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी पुणे महानगरपालिकेने दिली आहे. यासोबत काही नियम आणि अटीही घालून दिल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली. सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत. शहरात सध्या सर्व प्रकारची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, हॉटेल्सच्या बाबतीत या नियमांमध्ये बदल करण्यात आला. हॉटेलमध्ये सर्व ग्राहकांना मास्क अनिवार्य असेल, प्रत्येकाची थर्मल तपासणी करावी, ग्राहकांना मेनू कार्ड डिजिटल पद्धतीने द्यावे, असे नियम लावण्यात आले आहेत. आजपासून हॉटेल सुरू झाल्याने ग्राहक आनंदी झाले आहेत.