पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेल मालक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून मटका जुगार चालवत असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हॉटेल मालकासह तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३३ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल, असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हॉटेल मालक इंद्रजीत जर्नाधन भोईर (वय- ३२ रा. सावंतनगर, आळंदी), पवन चुडामन ठोकर (वय ४० रा. बौद्ध नगर पिंपरी), स्वप्नील रामेश्वर (वय २१ रा. काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील भोसरीमध्ये हॉटेल मालक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर मोठ्या प्रमाणावर मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, नितीन खेसे आणि विशाल भोईर यांच्या पथकाने भोसरीमधील हॉटेल मयुरेशचे मालक इंद्रजीत भोईर याला ताब्यात घेतले.