पिंपरी-चिंचवड (पुणे)- शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळणे शक्य होत नाही. याची गंभीर दखल महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. ऑटो क्लस्टर या ठिकणी महानगर पालिकेच्यावतीने 15 दिवसांमध्ये 400 ऑक्सिजनयुक्त बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचे साहित्य सोमवारी संबंधित ठिकाणी आणण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये उभारणार ऑक्सिजनयुक्त 400 बेडचे रुग्णालय.. - Pimpri-Chinchwad latest news
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, शहरातील महत्वाची खासगी रुग्णालये महानगर पालिकेने कोविड रुग्णासाठी ताब्यात घेतली आहे. मात्र, तरी देखील रुग्णांना जागा मिळत नसल्याने महानगर पालिकेच्या वतीने 400 बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, नगर सेवक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी बेडची संख्या वाढवण्याबाबत आयुक्तांकडे मागणी केली होती. याची दखल घेत 400 बेडचे साहित्य आणले गेले आहे. सहाय्यक आयुक्त इंदलकर म्हणाले की, खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन रुग्णांना जागा मिळत नाही अशी पारिस्थती आहे. त्यामुळे ऑटो क्लस्टर याठिकाणी महानगर पालिकेच्या वतीने 400 ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात येत आहे. त्याची पूर्व तयारी महानगर पालिकेच्या वतीने सुरू आहे. 15 दिवसात कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे.