पुणे - कोरोनाच्या लढाईत सामान्य माणसांप्रमाणे राजकीय पक्षाचे आणि गणेशोत्सव मंडळाचे कायकर्ते देखील जगले पाहिजेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर्स, पत्रकारांना नगरसेवक रासने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित केले आहे. कार्यकर्ता हा देखील कोरोना वॉरिअर आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत: किंवा दानशूरांकडून रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा काढायला हवा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार असे ३ हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य आयोजक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.