पुणे - 'जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यात कायम राहणार आहेत. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे', असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी वळसे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणाचे प्रमाण वाढवा
'जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिकांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढवण्यात आलेले आहे. तसेच दर 15 दिवसांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज आहे', असे वळसे पाटील म्हणाले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-मंगल कार्यलयावर कारवाई
'प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी', अशा सूचना वळसे- पाटील यांनी दिल्या.