पुणे -गणेशोत्सव पुण्याचे वैभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी सर्वच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवात सर्वांना घरच्या घरी 'बाप्पा'ची मूर्ती मिळावी, म्हणून येथील पाच राष्ट्रीय खेळाडू एकत्र आले आहेत. पुण्यातील गोखलेनगर येथे राहणाऱ्या या राष्ट्रीय हॉकीपटूंनी एकत्र येत ऑनलाईन आणि स्टॉलच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या मूर्ती विक्रीला सुरुवात केली आहे. सचिन भोंडवे, गौरव कांबळे, जितेश पनचाल, राहुल झोरे आणि अमर खराडे अशी पाच मित्रांची नावे आहेत.
सध्या कोरोनामुळे लोकांना आधीच्या तुलनेत अधिक आर्थिक चणचण भासत आहे. त्यात मुर्ती महाग झाल्या आहेत. काहींना मूर्ती हवी आहे. मात्र, बाहेर पडता येत नाही आहे. अशा सर्व लोकांसाठी हे खेळाडू स्वस्त आणि घरपोच मुर्ती विकत आहेत. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि शासनाने दिलेल्या नियमावलीचे नियम पाळले जात आहेत. आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक मुर्ती विकल्याचे या खेळाडूंनी सांगितले.
या पाचही मित्रांनी मॉडर्न हायस्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. हे पाचही जण ग्रीन मेडॉल्स या क्लबमधून हॉकीचा सरावही करतात. या सर्वांनी महाराष्ट्र संघाकडून राष्ट्रीय स्तरावर हॉकीचे सामने खळले आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वच काही बंद आहे. ग्राउंडवर सरावही बंद आहे. अशा परिस्थितीत पाचही मित्रांनी एकत्र येत गणेश मूर्ती विकायचे ठरवले. दरवर्षी गणेशोत्सवात ते त्यांच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती बसवायचे. मात्र, यंदा कोरोनामुळे लोकांना बाहेर जास्त निघता येत नाही. लोक आजही घराबाहेर पडायला घाबरत आहेत. म्हणून त्यांनी ऑनलाईन आणि त्यांच्या भागातील लोकांसाठी स्टॉलच्या माध्यमातून मूर्ती उपलब्ध करुन दिल्या आहेत.