पुणे- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी दोन्ही मतदारसंघात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, पहिल्यांदाच पुण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम म्हणाले, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी पुण्यात एकूण पोलीस बंदोबस्त ११ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १० पोलीस उपायुक्त, २० सहायक पोलीस आयुक्त, ९१ पोलीस निरीक्षक, ४३८ सहायक पोलीस निरीक्षक, ५१०४ कर्मचारी आणि १८२८ होमगार्डच्या जवानांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच सीआरपीएफच्या २ कंपन्या, एसआरपीएफच्या ३ कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.