पुणे -श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या साजऱ्या केल्या जात आहेत. मटन, चिकन दुकानांकडे वर्दळ वाढली आहे. अशातच आता पुण्यातून कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका चिकन विक्रेत्याचे कोंबड्या ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून वीस गावरान कोंबड्या चोरून नेल्या आहेत. त्यामुळे आखाड साजरी करण्यासाठी चोरट्यांनी कोंबड्याचे चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. 1 ऑगस्ट) पहाटे घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हडपसर परिसरातील हिंगणेमळा येथे अस्लम इस्माईल शेख या चिकन विक्रेत्याचे दुकान आहे. रविवार असल्यामुळे त्याने शनिवारीच गावरान कोंबड्या खरेदी करून त्या पिंजऱ्यात भरून ठेवल्या होत्या. सकाळी येऊन पाहिले असता अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे कुलूप तोडून वीस कोंबड्या चोरून नेल्याचे उघडकीस आले.