महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणेकरांवर हेल्मेटसक्ती; पाच महिन्यात तब्बल १९ कोटींचा दंड वसूल - crime

मागील ५ महिन्यात फक्त हेल्मेट परिधान न केल्यामुळे तब्बल ३ लाख ९२ हजार ५४६ दुचाकीचालकांकडुन तब्बल १९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ड्रेनेजचे खड्डे, अरुंद, खराब रस्ते, चुकीचे गतिरोधक असलेले रस्ते हे सगळे दिव्य रोजच सहन करणारे सामान्य नागरिक या हेल्मेटसक्तीला चांगलेच वैतागले आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 4, 2019, 4:08 PM IST

Updated : Jun 4, 2019, 5:14 PM IST

पुणे- १ जानेवरीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती लागू आहे. वाहतूक पोलीस त्याची अंमलबजावणी काटोकोरपणे करताना दिसत आहेत. या हेल्मेट सक्तीला सर्वपक्षीय पुणेकरांनी विरोध केला होता. मोठी आंदोलने झाली, मोर्चे काढले. तरीही पुणे पोलीस हेल्मेट सक्तीवर ठाम राहिले. जानेवारी ते मे २०१९ या ५ महिन्याच्या कालावधीत पुणे पोलिसांनी तब्बल ४५ कोटी रुपयांची रक्कम वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंडापोटी वसूल केली. यातील १९ कोटी रुपये हेल्मेट न वापरणाऱ्याकडून वसूल केले आहेत.

हेल्मेटसक्तीविषयी बोलताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि नागरिक

पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस भीषण होत असतानाच आता एक नवीन समस्या पुणेकरांना भेडसावत आहे. ती समस्या म्हणजे चौकाचौकात घोळक्याने उभे राहून वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांची. वाहतूक विभागाकडून सध्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ८० प्रकारे दंडात्मक कारवाई केली जाते. मागील ५ महिन्यात फक्त हेल्मेट परिधान न केल्यामुळे तब्बल ३ लाख ९२ हजार ५४६ दुचाकीचालकांकडुन तब्बल १९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ड्रेनेजचे खड्डे, अरुंद, खराब रस्ते, चुकीचे गतिरोधक असलेले रस्ते हे सगळे दिव्य रोजच सहन करणारे सामान्य नागरिक या हेल्मेटसक्तीला चांगलेच वैतागले आहेत. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना हेल्मेटसक्तीविषयी विचारणा केली असता त्या म्हणाल्या, हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा विरोध नाही. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून एकदम सर्वच दंड वसूल केला जातो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दंडाच्या पावत्या नागरिकांना वेळच्या वेळी मिळाल्या तर नागरिकांमध्ये उद्रेक निर्माण होणार नाही. त्यामुळे याविषयी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Last Updated : Jun 4, 2019, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details