पुणे- राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे.
20 ते 22 सप्टेंबरला मुसळधार पाऊसाचा इशारा
राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता, तो आत्ताही कायम असून राज्यात पुढील काही दिवस पाऊस असणार आहे. कोकण आणि गोव्यात पश्चिमी वारा जास्त असणार आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर 21 तारखेपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात 21 आणि 22 तारखेला काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 ते 22 सप्टेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भ या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.