बारामती - जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार 'हर घर दस्तक' अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागासह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने घरोघर जाऊन कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली जात आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगत पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तर अद्याप एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. बारामतीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग घेऊन लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
बारामतीत ३ लाख ७६ हजार ७८५ नागरिकांचे लसीकरण -
बारामतीत आत्तापर्यंत ३ लाख ७६ हजार ७८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पहिला डोस ९० टक्के नागरिकांना दिला आहे. तर दुसरा डोस ५४ टक्के नागरिकांना आतापर्यंत देण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे तर डोर्लेवाडी, गुणवडी, सोनगाव, झारगडवाडी मळदसह अन्य ४६ गावात नव्वद टक्क्यांहून अधिक पहिला डोस देण्यात आला असून उर्वरित गावांमध्ये ७० टक्यापर्यंत देण्यात आला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. गरोदर व स्तनदा मातांनी ही लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. संभाव्य तिसर्या लाटेत ज्यांचे लसीकरण अद्याप झाले नाही अशांना धोका संभवत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लसीकरणाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन -
दुसरी लाट ओसरत असतानाच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मास्क, सामाजिक आंतर, सॅनिटायझरचा वापर, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. विदेशात अनेक ठिकाणी तिसरी, चौथी लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनामार्फत सुरू असणाऱ्या लसीकरणाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.