पुणे/अमरावती- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेला यामधून सुट देण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे विविध ठिकाणी अडकलेले नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. अशात एका दिव्यांग महिलेने आपल्या मुलाला घरी आणण्यासाठी विशेष मोटारसायकलवरून (दिव्यांगासाठीची विशेष मोपेड) तब्बल एक हजार दोनशे किलोमिटरचा प्रवास केला. सोनू खंदारे, असे त्या महिलेचे नाव असून त्या पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात राहतात. अमरावतीतील कोकर्डा शेंडगाव येथून आपल्या मुलाला आणले. मी आता शाळेत गेल्यावर मला 'हिरकणीचा मुलगा'म्हणतील, अशी भावना त्यांच्या मुलाने 'ईटीव्ही भारत'समोर व्यक्त केली.
मुलासाठी दिव्यांग मातेचा विशेष दुचाकीवरून 1200 किलोमीटरचा प्रवास सोनु खंदारे यांचा नववीत शिकणारा मुलगा प्रतीक खंदारे 17 मार्च रोजी मामाच्या पाच वर्षीय मुलीला सोडण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कोकर्डा शेंडगाव या गावी गेला होता. चार-पाचदिवसानंतर तो आपल्या घरी परत निघणार होता. पण, तितक्यात लॉकडाऊन जाहिर झाले. त्यामुळे तेथेच अडकला. पण, त्याला सतत घरची आठवण येऊ लागल्याने तो सतत आईला फोन करुन मला घरी यायच आहे. मला खूप आठवण येत आहे, असे म्हणू लागला. आपल्या पोटचा गोळा तिथे अडकल्याने सोनु यांचेही जीव व्याकुळ होऊ लागले. काही दिवस अमरावतीला जाण्यासाठी त्यांनी धडपड केली. पण, वाहतूक पुर्णपणे बंद होती आणि पोलिसांकडूनही कोणतीच परवानगी मिळत नव्हती जायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. काही दिवस त्यांनी प्रतिकची फोनवरून समजुतही काढली.
पोलिसांकडून प्रवासासाठी परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती मिळताच ती परवानगी काढण्यासाठी सोनू खंदारे यांनी प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी परवानगी अखेर मिळाली. केवळ 48 तासांत परत येण्याच्या अटीवर पोलिसांनी ही परवानगी दिली होती. चारचाकीने जाऊन यावे यासाठी त्यांनी चौकशी केली. पण, चारचाकीने जाऊन येणे हे परवडणारे नव्हते. कारण, घरची परिस्थीत हालाकीची सोनु या एका खासगी कंपनीत काम करत होत्या. पण, टाळेबंदीमुळे त्यांची पगार झाली नाही तर त्यांचे पती टेलर आहेत. त्यांचाही व्यवसाय टाळेबंदीमुळे बंद झाला आहे. अखेर त्यांनी त्यांच्या विशेष मोटारसायकलवरुन जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रवास सुरु केला.
त्यांनी 24 एप्रिल रोजी सकाळी लवकर आपले घर सोडले. प्रवासात खाण्यासाठी भाजी-भाकरी घेतली. सतत त्यांनी प्रवास सुरु केला. प्रवासादरम्यान त्यांना अनेक अडचणी आल्या. कारण, त्यांची मोटारसायकलही सामान्य मोपेड नसून विशेष आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे त्यांना चुकविता येत नव्हते. वाटेत त्यांचे वाहन पंक्चरही झाले. पण, त्यांनी हार मानली नाही आपल्या मुलाला आणण्यासाठी त्या प्रवास करतच राहिल्या. प्रवास करुन थकल्यानंतर रात्रीच्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही असलेल्या पेट्रोलपंपावर मुक्काम केला. त्यानंतर पहाटे त्यांनी आपला प्रवास सुरु केला. अमरावतीतील कोकर्डा शेंडगाव गाठून कसलीही विश्रांती न घेता परतीचा प्रवास सुरु केला. पोलिसांनी सांगितलेल्या वेळेत त्या परत येत त्यांनी आपल्या मातृत्वापुढे आभाळ ठेंगणे केले आहे. त्यांच्या या मातृत्वाला 'ईटीव्ही भारतचा सलाम..!'