पुणे - कोरोना विषाणू साथीच्या आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार आणि हाजी गुलाम महंमद आझम ट्रस्टच्या वतीने गरीब आणि गरजू वर्गातील सर्वधर्मीय २०० कुटुंबांना १५ दिवसांचे जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. ३१ मार्च पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून आझम कॅम्पस येथे दररोज या कुटुंबांना टप्प्या टप्प्याने बोलावून मदत दिली जात आहे. आज १ एप्रिल रोजी देखील सकाळी ११ वाजता आझम कॅम्पसच्या असेम्बली हॉलमध्ये मदतीचे वितरण करण्यात आले. डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते या कुटुंबाना जीवनोपयोगी साहित्य देण्यात आले.
त्यात अन्नधान्य,पीठ ,तेल ,चहा ,साखर इत्यादी घटकांचा समावेश आहे. २०० घरातील प्रत्येकी ५ जणांना १५ दिवस पुरेल इतका शिधा देण्यात येत आहे . यासाठी ट्रस्ट ने २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी अवामी महाज संघटनेचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 'संकटाच्या वेळी सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मुकाबला करणे गरजेचे असून 'आहे रे ' वर्गाने या संकटात 'नाही रे ' वर्गाकडे लक्ष दिले पाहिजे. तीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे, असे डॉ पी. ए. इनामदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.