पुणे - व्यापाऱ्याचे गोठलेले बँक खाते पुन्हा सूरू करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या जीएसटीच्या विक्रीकर अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या अधिकाऱ्याने दीड लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील एक लाख रूपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे.
व्यापाऱ्याचे गोठलेले बँक खाते सुरू करण्याचे आमिष, एक लाखांची लाच घेताना विक्रीकर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Gajanan Shinde
व्यापाऱ्याचे गोठलेले बँक खाते पुन्हा सूरू करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या जीएसटीच्या विक्रीकर अधिकाऱ्यास बुधवार रंगेहाथ अटक झाली आहे.
रामकृष्ण यादवराव माने (वय ४५ वर्षे, रा. बीटी कवडे रोड, पुणे) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय व्यापाऱ्याने लाचपूत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार व्यापाऱ्याचे बँक खाते गोठवण्यात आले होते. तसेच त्याच्या कंपनीला नोटीसदेखील पाठवण्यात आली होती. गोठवलेले खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जीएसटीचे विक्रीकर अधिकारी रामकृष्ण माने यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रूपयांची लाच देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने याची माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. तक्रारीची खातरजमा करून एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचांसमक्ष रामकृष्ण माने यांनी एक लाख रूपयांची लाच घेतली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.