पुणे - महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून जुन्नर तालुक्यात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. द्राक्ष महोत्सवात पर्यटक, शेतकऱ्यांना द्राक्षांची चव चाखता यावी, यासाठी थेट द्राक्ष बागेत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला शेतकरी व पर्यटकांनी गर्दी केली आहे.
जुन्नर तालुक्यातील आर्वी आणि अमरापूर गावात द्राक्ष महोत्सव... हेही वाचा...'पुण्यातील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 'त्या' तिघांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत'
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आर्वी आणि अमरापूर या दोन गावात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या हस्तेच महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या दोन दिवसीय महोत्सवात रसायन मुक्त द्राक्षांची लागवड, पॅकिंग आणि त्यापासून वाईन बनवणे, आदी प्रात्यक्षिके पाहता येणार आहे. पर्यटकांकडून परदेशात निर्यात होणाऱ्या गोड चवीच्या रसाळ द्राक्षांचा आस्वाद आणि माहिती घेण्यास पसंती मिळत आहे.
मंगळवारी राज्यभरातील खवय्यांनी भेट देऊन द्राक्षाच्या विविध जातींची चव चाखली. यासोबत द्राक्ष बागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्ष पिक, द्राक्षांची तोडणी, पॅकींग, विक्री कशी केली जाते, याची माहिती घेतली. जुन्नरच्या खाद्य संस्कृतीचीही लज्जत या महोत्सवात पर्यटक, महिला बचत गटातील महिलांनी अनुभवली आहे.
हेही वाचा.......अन् आमदार पतीच्या ढोलकीवर खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका
द्राक्ष महोत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांसाठी आयोजकाकडुन मासवडी, शेंगोळी, कांदा चटणी, बाजरीच्या भाकरी, वांग्याच भरीत ,खर्डा, गोड लापशी हे पदार्थ द्राक्ष बागेत उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे पर्यटकांनी पंगत करुन या पदार्थांवरही ताव मारला. या महोत्सवाचे आयोजन तालुक्यातीलच युवतींनी केले आहे. सोमवारपासुन सुरु झालेला हा द्राक्ष महोत्सव दोन दिवस सुरू राहणार आहे. याशिवाय बांधावरुन द्राक्ष खरेदी करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.