पुणे -चासकमान जलाशय परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह परतीच्या पाऊसाने झोडपले. यावेळी चासकमान जलाशय परिसरातील ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असताना कहु कोयाळी येथुन ओढ्याच्या नालीतुन महिलेसह चिमुकला मुलगा पाण्यात वाहुन गेल्याची धक्कादायक घटना घडली. भोराबाई बुधाजी पारधी (वय 43) आणि साहिल दिनेश पारी (वय 4) असे वाहुन गेलेल्या आजी आणि नातवाचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील पूर्व भागातुन पश्चिमकडे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरू होता. त्यावेळी चासकमान जलाशय परिसरात पाऊसाचा जोर वाढला होता. या पाऊसाने डोंगरदऱ्यांतुन वाहणारे ओढे नाले दुथडी भरुन वाहत होते. यावेळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
तर चासकमान परिसरातील कहु-कोयाळी परिसरात पाऊसाचा जोर सुरू असताना भोराबाई पारधी या नातू साहिल याच्या सोबत शेतात होत्या. पाऊसाचा जोर कमी होत नसल्याने पाऊसातच भोराबाई आपल्या नातवासह घराकडे जात असताना रस्त्यावरील मोरीवरुन चालत असताना पाय घसरुन पडल्या. यावेळी वाहत्या पाण्याचा जोर जास्त असल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले आहे. त्यांचा स्थानिक नागरिकांकडून शोध सुरू आहे.