काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाचे वर्चस्व पुणे Gram Panchayat Election Result 2023 :बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींचे मतदान काल पार पडले. या 31 ग्रामपंचायतींचा निकाल आज (सोमवारी) जाहीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. (BJP Wins in Katewadi Gram Panchayat) मात्र, पुन्हा एकदा त्यांनी काटेवाडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र एक हाती सत्ता असणाऱ्या या ग्रामपंचायतीवर दोन भाजपा विचारांचे उमेदवार निवडून आल्याने भाजपाकडून मोठा जल्लोष करण्यात आला.
शिंदे-फडणवीस आणि पवार गटात चुरशीची लढत:बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे, तर काटेवाडी हे गाव पवार कुटुंबीयांच्या नावानं ओळखलं जातं. गेली कित्येक वर्ष झाले काटेवाडी ग्रामपंचायतीवर पवार कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादीमधून बंड केलेले अजित पवार, शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेत सामिल झाले. तरीही महायुतीत एकत्र असलेले शिंदे-फडणवीस आणि पवार यांच्यामध्येच काटेवाडी ग्रामपंचायत जिंकण्यावरून चुरशीची लढत पाहायला मिळाली.
अजित पवार गटाचा किल्ला अभेद्य:यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी राष्ट्रवादी बरोबरच भाजपा आणि शिंदे गट देखील सरपंच पदासाठी नशीब आजमावत आहे. हे दोन्ही गट अजित पवार गटाला टक्कर देताना दिसून आले. असं असलं तरी अजित पवार गटाचं प्राबल्य जास्त असल्यानं शिंदे गट आणि भाजपा अजित पवार गटाच्या आव्हानांसमोर टिकू शकले नसल्याचं या निकालावरून दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नेतृत्व जनतेला मान्य: दरम्यान, महायुतीनं ग्रामपंचायतीत चांगलं यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे. त्यांचं नेतृत्त्व जनतेनं मान्य केलं आहे. त्याचाच हा परिपाक आहे. तसंच विरोधी पक्षानं म्हटलं होतं की, या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल. मात्र महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीची ही एक लिटमस लेस्ट होती. या टेस्टमध्ये महायुती पास झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला: या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांनी बाजी मारली आहे. तर अनेकांना धक्का बसला आहे. कोकणात मंत्री दीपक केसरकर यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांच्या पॅनेलला चांगलं यश मिळालं आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलला आमदार आंबिटकर यांनी धक्का देत विजय मिळवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनेलने प्रतिष्ठा राखत अनेक जागांवर विजयी झाले आहेत.
हेही वाचा:
- Gram Panchayat Election : दिलीप वळसे पाटील यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था, गावात सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार विजयी
- Gram Panchayat Result २०२३ : ग्रामपंचायत निकालावरुन नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल; कोण नंबर वन?
- Gram Panchayat Election 2023: ग्रामपंचायत निवडणुकीतील यश म्हणजे महायुतीच्या कामांचा विजय, शिंदे गटाची प्रतिक्रिया